गंगाखेड │ लिंबेवाडी (ता. गंगाखेड) येथे गेल्या काही वर्षांपासून काही समाजकंटकांकडून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू असून, बौद्ध समाजावर अन्याय, धमक्या आणि भेदभावाच्या घटना सातत्याने घडत आहेत. गावातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी संबंधित समाजकंटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बौद्ध समाजबांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लिंबेवाडीत दररोज बौद्ध विहार परिसरात सामूहिक बुद्ध वंदना आयोजित केली जाते. मात्र, गावातील काही समाजकंटक तेथे जाणीवपूर्वक येऊन अश्लील वर्तन करतात, दारू पिऊन दंगा करतात आणि बौद्ध बांधवांना त्रास देतात. यामुळे शांततामय वातावरण दूषित होत आहे.
एप्रिल २०२४ मध्ये गावाच्या चौकात लावलेल्या निळ्या ध्वजावरून वाद उफाळला. काही समाजकंटकांनी बौद्ध समाजाच्या युवकाला जातीवाचक शिवीगाळ करत त्याच्या घरात जबरदस्तीने घुसून मारहाण केली. बौद्ध समाजबांधवांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली होती. ११२ आपत्कालीन सेवेला कॉल करून मदत मागण्यात आली होती, मात्र प्रकरण केवळ पोलीस स्टेशनच्या नोंदीपर्यंतच मर्यादित राहिले.
यानंतर गावातील हनुमान मंदिरात बैठक घेऊन बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर गावात बौद्ध समाजाला सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांवर कोणताही कार्यक्रम सादर करू नये, असा अजब फतवा काढत ती गीते मध्येच बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामानवाच्या विचारांना आणि त्यांच्या गीतांवर बहिष्कार घालण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
गावातील समाजकंटकांनी बौद्ध समाजातील युवकांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या तसेच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. “येणाऱ्या २०२५ च्या भीमजयंती साजरी करू देणार नाही, तसेच त्यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. आता यांची भाकर बंद करू, त्यांना गावात जगू द्यायचे नाही,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावातील सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी संबंधित समाजकंटकांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बौद्ध समाजबांधवांनी केली आहे.
गावात जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि शांतता टिकवावी, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.













