मुंबई : नोकरीच्या शोधामध्ये मुंबईमध्ये देश-विदेशातून कामगार येत असतात, पण या कामगारांबाबत महाराष्ट्र सरकारने कडक पावलं उचलली आहेत.संपूर्ण देशभरामध्ये अवैध प्रवाशांच्या विरोधात कारवाईने जोर धरला आहे. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी नागरिकाने हल्ला केल्यानंतर सरकारकडून भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.
यातच आता महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत मुंबईतल्या बिल्डर्स आणि ठेकेदारांना बांगलादेशी नागरिकांना कामावर ठेवू नका, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. तसंच एखाद्या प्रोजेक्टमध्ये बांगलादेशी आढळला, तर तात्काळ त्याची सूचना पोलिसांना द्यायची जबाबदारी त्यांची आहे, असंही योगेश कदम यांनी स्पष्ट केलं आहे.
पोलीस आणि श्रम विभागाने मुंबई तसंच ठाण्यात बांगलादेशींना कामावर ठेवण्याबद्दल ठेकेदार आणि बिल्डर्सची चौकशी केली, पण माहिती मिळण्यामध्ये वेळ गेला, असं योगेश कदम म्हणाले. भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य सरकारने केलेल्या कारवाईबद्दल प्रश्न विचारला, त्यावर योगेश कदम यांनी सभागृहामध्ये हे उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्याच्या इतिहासात सगळ्यात जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांना निर्वासित केलं आहे. 2024 साली राज्यात 202 बांगलादेशींना निर्वासित केलं गेलं, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे. बंगाल सरकारकडून सहकार्य केलं जात नसल्यामुळे बहुतेक अटक केलेल्यांना निर्वासित करता येत नसल्याचंही योगेश कदम यांनी सांगितलं.













