देवळी प्रतिनिधी : सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य परिसरात ‘लहान महादेव’ म्हणून प्रसिद्ध प्राचीन शिवलिंग ढगा येथे स्थित आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी तीन दिवस भव्य यात्रा भरते. अनेक यात्रेकरू महाशिवरात्रीच्या दिवशी याच ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी बारस सोडून जातात. ढगा हे स्थळ खरांगणा-बांगडापूर जंगल परिसरात असून सध्या बोर वाघ्र प्रकल्प अंतर्गत या परिसराचे व्यवस्थापन आहे. ढगा येथे प्राचीन काळात धौम्म्य ऋषींनी तपश्चर्या करून येथील दगडाच्या कपारीत शिवलिंगाची स्थापना केली होती व तेव्हापासूनच या प्राचीन शिवलिंगाचे महत्त्वाचे स्थान आहे. धौम्म्य ऋषींच्या नावावरून धाम नदी हे नाव पडलेले आहे. धौम्म्य ऋषीनंतर अनेक ऋषी व संतांचे या परिसरात वास्तव्य राहिलेले आहे. हे स्थळ अत्यंत पवित्र मानले जाते.
महाशिवरात्री यात्रा व प्रहार समाज जागृती संस्थेचा सेवा प्रकल्प :
महाशिवरात्रीला दरवर्षी साधारणपणे एक लाखाच्या आसपास भक्तगण येतात. येथील प्राचीन शिवलिंग दगडाच्या कपारीत असल्यामुळे एकावेळी एकच भक्त आत मध्ये जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी भरपूर असते. म्हणून पुरुष व महिला अशा दोन वेगळ्या रांगा लावणे गरजेचे असते. म्हणून 1996 पासून स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था या ठिकाणी आपल्या प्रहारच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचे काम करते. यात स्त्री-पुरुषांच्या वेगळ्या रांगा लावणे, प्रथमोपचार केंद्र, यात्रे करूंकरिता पिण्याच्या पाण्याची सोय, वनाचे संवर्धन व गडावरील महादेवाचे दर्शन घेण्याकरता वृद्ध, महिला व बालकांना सुरक्षितपणे चढण्याकरिता मदत करण्याचे कार्य प्रहार संस्था करत असते. यावर्षी सुद्धा प्रहार समाज जागृती संस्था अंतर्गत देवळीच्या एस एस एन जे महाविद्यालयातील ६० रोव्हर स्काऊट रेंजर गाईड व प्रहार संस्थेचे स्वयंसेवक भक्तगणांच्या सेवेकरीता सज्ज आहेत. प्रहार संस्थेचे अध्यक्ष तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, प्रहार चे सचिव संतोष तुरक, प्रा. रवींद्र गुजरकर, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र बोरकर, उपाध्यक्ष प्रदीप दाते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प राबवल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांचे नेतृत्व रोव्हर आदर्श नाईक अभिषेक नेहारे, मनोज नेहारे, निशांत चितळे, श्रद्धा मडावी, सुजल पराते व रेंजर वैष्णवी शिरभाते यांच्यासह स्वयंसेवक करणार आहेत.













