सावंगी मेघे : 21 जानेवारी 2025: सावंगी मेघे येथील पोलीस स्टेशनने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात मोठी यशस्वी कार्यवाही केली आहे. फिर्यादी आषिश बाबाराव ढोणे, रा. सावंगी मेघे यांनी तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या दवाखान्याजवळील कॅफेसमोर उभी ठेवलेली त्यांची ए एक्टीव्हा मोपेड (गाडी क्र. एमएच 32 एए 0137) चोरीला गेली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन सावंगी येथे गुन्हा क्र. 0024/2025, कलम 379 अंतर्गत नोंद करण्यात आली होती.
गुन्हे प्रकटीकरण पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, एक संशयित सावंगी ते सालोड रोडवरील सैनी हॉटेलजवळ चोरीची मोपेड गाडी घेऊन थांबला आहे. पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीस गेलेली एक्टीव्हा मोपेड (किंमत ₹15,000) जप्त करण्यात आली.
पुढील चौकशीत मोठा मुद्देमाल हस्तगत
चौकशीतून आरोपीकडून खालील अतिरिक्त गाड्या जप्त करण्यात आल्या:
1. एमएच 32 वाय 3326 (किंमत ₹70,000)
2. प्लेजर मोपेड एमएच 32 एएन 7355 (किंमत ₹55,000)
3. होंडा डिओ एमएच 31 डीएच 3383 (किंमत ₹70,000)
4. सुझुकी असेस एमएच 31 डीक्यू 9739 (किंमत ₹60,000)
5. एक्टिवा एमएच 32 एटी 4411 (किंमत ₹75,000)
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹3,45,000 आहे.
जप्त केलेल्या गाड्यांतील काही गाड्यांचे मालक वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून तक्रार दाखल होणे बाकी आहे. उर्वरित गाड्यांच्या मालकांचा शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहा. पोलीस निरीक्षक संदिप कापडे, पो.हवा सतिश दरवरे, संजय पंचभाई, अनिल वैद्य, निलेश सडमाके, कॉन्स्टेबल निखील फुटाणे आणि अमोल जाधव यांचा समावेश होता.
पुढील तपास पोहवा संजय पंचभाई करीत आहेत. आरोपीकडून आणखी चोरीचा मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे.













