गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वंचित आणि गरीब महिलांकडून खासगी रुग्णालये सोनोग्राफी आणि सिजेरियन शस्त्रक्रियेसाठी जादा शुल्क आकारून आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे महिलांना पर्याय नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात जिजाऊ महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा जाधव यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास लगास यांची भेट घेऊन गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी व सिजेरियन शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर करताना जाधव यांनी, “जर याबाबत तातडीने कारवाई झाली नाही तर जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला आहे.
निवेदन देताना जिजाऊ महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा जाधव यांच्यासह रेखा राजपूत, संगीता वाघ, सुनीता सोळके, शीला जाधवत आणि इतर सदस्य उपस्थित होत्या.
गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा पुरवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी आणि सिजेरियन शस्त्रक्रियेसाठी सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे. यामुळे खासगी रुग्णालयांच्या आर्थिक लुटीला आळा बसेल आणि महिलांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळू शकतील.













