सोलापूर प्रतिनिधी – प्रा. राजेश गायकवाड
आपण ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ अशी म्हण ऐकली होती, परंतु करमाळा तालुक्यातील मिरगव्हान येथील भैरवनाथ सुरवसे यांनी ही म्हण सुधारून ‘काळ्या आईची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ हे दाखवून दिले आहे.
भैरवनाथ सुरवसे यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांनी शेतीला जोडून ऊस वाहतूक करण्यासाठी चार ट्रॅक्टर चालवले आहेत. त्यातील तीन ट्रॅक्टर व्यवसाय म्हणून काम करत असताना, एक ट्रॅक्टर गरीब शेतकऱ्यांच्या शेतीकामांसाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे. “तेल भरून आपली शेतीची कामे करा,” असा त्यांचा उद्देश आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत त्यांनी जवळपास १५० ते २०० एकर शेतीची कामे केली आहेत. सुरवसे यांनी एक रजिस्टर ठेवून ट्रॅक्टरची सूची तयार केली आहे, ज्यात काम करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यात येतात.
भैरवनाथ सुरवसे यांनी आपल्या चुलत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘जय जवान जय किसान’ या योजना सुरू केली आहे. चुलते कै. सूर्यभान देवराव सूर्यवंशी व कै. दादासाहेब ईश्वर सुरवसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

भैरवनाथ यांच्या या योजनेसाठी पूर्व भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गरीब शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करण्यासाठी पैसे नसतात, ज्यामुळे त्यांना अडचणी येतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त डिझेल भरून मशागतीची कामे मोफत करून घेता येतात, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. “आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घाला आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे,” असं त्यांनी सांगितले.
भैरवनाथ सुरवसे हे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. उडीद पिकं काढल्यानंतर या योजनेचा प्रचार सुरू आहे आणि सुरवसे यांच्या या उपक्रमाची तालुक्यात सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.













