पुलगाव: पुलगाव-मोर्शी बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनुसया देवीदास पकडे यांची हरवलेली पर्स परत मिळाल्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले. त्या मोर्शीहून बस क्रमांक MH-40 : 5598 ने प्रवास करत वर्धामनेरी येथे उतरल्या. बस पुढे गेल्यानंतर वाहक अर्चना संजय निकम यांना महिलेची पर्स आढळून आली.
बस आर्वी बसस्थानकात पोहोचल्यानंतर चालक प्रशांत सावरकर आणि वाहक अर्चना निकम यांनी प्रवासी महिलेशी संपर्क साधून पर्स वाहतूक नियंत्रक कक्षात जमा केली. पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, पैसे, आधारकार्ड आणि संपर्क क्रमांक होते. या संपर्क क्रमांकामुळे महिलेशी संवाद साधणे शक्य झाले.
चालक-वाहक यांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे वाहतूक प्रशासनाने त्यांचे कौतुक केले. अशा कर्मचाऱ्यांमुळे एसटी प्रवासावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.












