सोलापूर प्रतिनिधी: – ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 शिर्डी येथे बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला. यावेळी अभिनेत्री चित्रा दीक्षित, अभिनेत्री वंदना गव्हाणे आणि अध्यक्ष तथा दिग्दर्शक सुदाम संसारे यांच्या हस्ते सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बाळासाहेब नरारे गेली 27 वर्षे करमाळा येथील संगीत आणि योगा च्या माध्यमातून समाजसेवा आणि देशसेवा करीत आहेत. त्यांचे संगीत आणि योगाच्या क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद, अलंकार आणि पीएचडी प्रमाणपत्र मिळवून जीवनात यशस्वी झाले आहेत. राज्यभर तसेच राज्याच्या बाहेरही त्यांचे संगीत आणि योगा संबंधित कार्य सुरू आहे.
संगीत व योगाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे, याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी, देशहित आणि समाजसेवेच्या कार्याची ओळख आज ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांनी “साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025” ने सन्मानित केली आहे.
यावेळी अध्यात्म आणि योगा क्षेत्रातील कार्याबद्दल सौ. रेशमा जाधव यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, डॉ. कविता कांबळे, डॉ. श्रद्धा जवंजाळ, समाजसेवक श्रेणिक भाई खाटेर, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव शिवकन्या नरारे तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवार करमाळा, सुरताल संगीत विद्यालय परिवार यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.













