प्रतिनिधी / भंडारा:
भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिसांनी अवैध रेती वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 1,31,80,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 18 जानेवारी 2025 रोजी पहाटे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे, काही ट्रक एनएच-53 महामार्गावरून छत्तीसगडहून विनापरवाना रेती वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारधा चौक व साकोली टोलनाका येथे सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान, ट्रक क्र. MH 37 W 7776, MH 30 BD 7029, आणि NL 01 AM 4862 मध्ये परवानगीशिवाय रेती वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान ट्रक क्र. NL 01 AM 4862 चा चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी संतोष भारत चव्हाण (रा. म्हसनी, जि. वाशिम) व शेख अकबर शेख अजगर (रा. शतरंजीपुरा, बाळापूर, जि. अकोला) या दोन आरोपींना अटक केली. याशिवाय, चार आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींमध्ये ट्रक चालक व मालकांचा समावेश आहे.
या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 11/2024 नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्यांतर्गत भारतीय दंड संहितेचे कलम 303(2)49 व 411, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम 48(8), आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलम 7 व 9 लागू करण्यात आले आहेत.तीन ट्रक 30 ब्रास रेती जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,31,80,000/- आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, पोलीस हवालदार दिलीप धावडे, त्र्यंबक गायधने, रत्नाकर लाडे, व पोलीस शिपाई सचिन बावनकुळे यांनी सहभाग घेतला.
फरार आरोपींचा शोध सुरू असून, तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.













