गंगापूर प्रतिनिधी:
गंगापूर-वैजापूर रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वीच ओव्हरलोड ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशातच, 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील सातबारा हॉटेलसमोर आणखी एक अपघात घडला.
उसाने भरलेल्या ट्रॅक्टर (MH 20 EJ 3174) ला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने (MH 12 US 1965) जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तत्काळ सागर शेजवळ यांच्या मोरया रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल करण्यात आले.
अपघाताचे कारण नेहमीप्रमाणेच ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टरचा अभाव असल्याचे समोर आले आहे. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टर बसविण्याबाबत पोलिसांकडून वारंवार सूचना व जनजागृती केली जाते. मात्र, चालक व मालक याकडे दुर्लक्ष करत असल्याने असे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळेस मोठ्या आवाजात टेप लावून ट्रॅक्टर चालवण्याच्या प्रथेमुळे रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना ट्रॅक्टरचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
अपघातग्रस्त रस्त्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून मागणी होत आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













