
कोपरगाव : इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) या सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग संस्थेकडून संजीवनी के. बी. पी. पॉलीटेक्निक ला विविध निकषांच्या आधारावर ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स २०२४’ या पुरस्काराने नुकतेच कोलकाता येथे सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्काराने संजीवनीच्या मुकुटात अधिकचा एक मानाचा तुरा रोवला गेला.
संजीवनी पॉलिटेक्निक ग्रामीण भागात असूनही विविध पातळीवर विविध कीर्तिमान स्थापित करीत आहे. संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उपलब्धीचे स्वागत केले. प्राचार्य, विभाग प्रमुख, डीन्स, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तेलंगणा मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर बीआरव्ही सुशील कुमार, निवृत्त इस्त्रो शास्त्रज्ञ तपन मिस्त्रा, आयईआयचे अध्यक्ष डॉ. जी. रंगनाथ, इंजिनिअर व्ही. बी. सिंग यांच्या हस्ते पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर व डीन अकॅडमिक्स प्रा. के. पी. जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आयईआयने पॉलिटेक्निकला सलग ९ वर्षे मिळालेले एनबीए मानांकन, स्कोपस इंडेक्स जर्नलमध्ये शिक्षकांचे प्रसिध्द झालेले शोधनिबंध, शिक्षकांचे प्रसिध्द झालेली पुस्तके, संशोधन, विकास आणि कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन, पीएच.डी व एम. टेक शैक्षणिक अर्हता असणाऱ्या शिक्षकांची संख्या, शिक्षकांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मिळालेले पुरस्कार, शिक्षक विकास कार्यक्रमात शिक्षकांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, विद्यार्थी उद्योजक होण्यासाठीचे प्रयत्न व पुरावे, संस्था आणि उद्योग यांच्यातील सामंजस्य करार आणि विद्यार्थ्यांना होणारे फायदे, माजी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, कॅम्पसमधील विद्यार्थी सुरक्षा, नवकरणीय ऊर्जेचा वापर, संस्थेस मिळालेले विविध पुरस्कार, संशोधनाबद्दलची पेटेंटस्, संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या, विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि मिळवलेली बक्षिसे आदी बाबींची पडताळणी केली. त्यानंतर ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केले.












