वर्धा, २४ डिसेंबर २०२४:
वर्धा जिल्ह्यातील स्थानीक गुन्हे शाखेने पावर हाऊसच्या मागील शिवारात गावठी दारू निर्मितीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत एकूण ४,०१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
२४ डिसेंबर २०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक देवळी तालुक्यातील मौजा देवळी शिवारातील पावर हाऊसच्या मागे गावठी मोहा दारू तयार करण्याच्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनास्थळावरून ३,६०० लिटर कच्चा मोहा दारू रसायन ,लोखंडी ड्रम आणि भट्टीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले . या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ४,०१,००० रुपये असून, त्याला घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी अमर अंबादासजी तांडेकर (राह. आंबेडकर नगर, देवळी) याच्याविरोधात पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पथकात पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, मनीष कांबळे आणि अमोल नगराळे यांचा समावेश होता.
ही धडक कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे उत्तम उदाहरण असून, अवैध दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी घेतलेला ठोस निर्णय जनतेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.













