मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे शेतमालक कृष्णा नारायण चामे (वय ५२) यांची त्यांच्या सालगड्याने सोन्याच्या लोभातून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १४ डिसेंबर रोजी घडली असून, मोहोळ पोलिसांनी तात्काळ तपास करत संशयित आरोपी सचिन गिरी याला अटक केली आहे.
सचिन गिरी हा मागील दहा महिन्यांपासून चामे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करत होता. त्याने आपल्या मालकाच्या अंगावरील सोन्याच्या लोभातून वस्तीवरील घरातच खून केला. खून लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते घराच्या मागील शोष खड्ड्यात पुरले.
या प्रकरणाचा तपास करताना मोहोळ पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आणि २२ डिसेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. घटनास्थळावरील पुरावे गोळा करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली आहे.
या घटनेमुळे यल्लमवाडी गावात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या वेगवान तपासकार्याचे कौतुक होत आहे.













