सिरोंचा:विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर सिरोंचाचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
सिरोंचा तालुक्यातील मॉडेल स्कुल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार हमीद सय्यद, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू हकीम,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम,नायब तहसीलदार तोटावार,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,माजी जि प अध्यक्ष समय्या पासूला,वेंकटलक्ष्मी आरवेली,राकॉ चे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भोगे,नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,नगरसेवक सतीश राचर्लावार,गटशिक्षणाधिकारी डी.निलकंठम,सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी केंद्रप्रमुख आणि शिक्षकांकडून आमदार आत्राम यांचे शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक, शैक्षणिक साहित्य गट,लोकसंख्या शिक्षण व प्रयोगशाळा परिचर गटातून उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे.मान्यवरांनी उपकरणांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.
२४ डिसेंबर पर्यंत तालुक्यातील विविध विद्यालयांतील विध्यार्थी मॉडेल प्रदर्शित करणार आहेत.यादरम्यान विद्यार्त्यांना प्रदर्शन बघण्यासाठी संधी मिळणार आहे.तर २५ डिसेंबर रोजी समारोप व बक्षीस वितरण केले जाणार आहे.













