
अहिल्यानगर :सहा महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला.
इतिहासात पहिल्यांदाच महायुतीला एवढे बहुमत मिळालयं.२०२४ हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे गाजले. दरम्यान २०२५ मध्ये देखील अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती, १२ नगरपालिका आणि ९९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी दिसेल आणि या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी मोठी कसरत घेतलेली आहे. यामुळे आता आमदार, खासदारांना या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
साहजिकच, या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या फारच अधिक राहणार आहे अन यामुळे तिकीट वाटपात रुसवे-फुगवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळता सांभाळता आमदार, खासदारांच्या नाकी नऊ येणार आहे.
मागील दोन अडीच वर्षांपासून जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती यांच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून या निवडणुका लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेत ६८ नगरसेवकांचे संख्याबळ असून त्या ठिकाणी डिसेंबर २०२३ पासून प्रशासकांच्या हाती कारभार आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेबाबत बोलायचं झालं तर तिथे ७३ सदस्यांचे संख्याबळ असून त्या ठिकाणी मार्च २०२२ पासून प्रशासक कारभार पाहत आहेत. २०२४ डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतीची मुदत संपणार असल्याचे समजते
जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान आणखी १४ ग्रामपंचायतची मुदत संपणार असून या संबंधित ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्याचे काम सुरु आहे. यामुळे पुढील वर्षी या कार्यकाळ संपणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये झाल्या होत्या.मात्र या पंचायतराजच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी बनवून निवडणूक लढवली जाऊ शकते किंवा पक्ष बलावर स्वतंत्र निवडणूक लढवली जाणार आहे.











