
अहिल्यानगर :भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला आहे. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते.
पण त्यांची आजारपणासोबत सुरु असलेली झुंज आज संपली आहे. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते.
ते अहिल्यानगर अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्रदेखील काम केलं होतं.











