
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर एका व्यापारी कुटुंबाला कारमध्ये झोपणे चांगलेच महागात पडले. बुधवारी (४ डिसेंबर) पहाटे चारच्या सुमारास, कन्हैय्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये कोयता गँगने हल्ला करून ४.६ लाखांचे दागिने हिसकावून नेले.
रितेश सुरेश पटवा (वय ३७, रा. साईनाथनगर, पाथर्डी) हे आपल्या कुटुंबासह पुण्यातील एका लग्न सोहळ्यासाठी मंगळवारी (३ डिसेंबर) कारने गेले होते. सोहळ्यानंतर रात्री साडेनऊ वाजता घरी परतण्यासाठी त्यांनी प्रवास सुरू केला. पहाटे तीनच्या सुमारास केडगाव शिवारात आल्यावर झोप अनावर झाल्याने रितेश यांनी कुटुंबासह कन्हैय्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी उभी करून झोप घेतली.
तासाभराने, विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धारदार कोयत्याच्या धाकाने त्यांना झोपेतून उठवले. त्यांनी प्रियंका व शोभा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. विरोध करणाऱ्या रितेश व प्रियंका यांना कोयत्याने मारहाण केली.
हल्लेखोरांनी कारवरही हल्ला केला आणि मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले. नंतर रितेश यांनी आरडाओरडा केला, त्यावर स्थानिक नागरिक जमा झाले. कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली.
कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
रात्रीच्या प्रवासात झोप येत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. निर्जन ठिकाणी थांबणे टाळण्याची विनंतीही करण्यात आली आहे.











