मूल प्रतिनिधी: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बल्लारपूर, पोंभूर्णा आणि मूल या तालुक्यांमध्ये नावाजलेले व्यक्तिमत्त्व ॲड. रितेश बळवंत पाटील मारकवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपासून ॲड. मारकवार यांनी मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर या तीनही तालुक्यांत व्यापक जनसंपर्क साधला आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी, महिला कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांमुळे त्यांनी या क्षेत्रात आपली मजबूत छाप पाडली आहे. कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
वकील व्यवसायात प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित असलेल्या मारकवार यांचे घराणे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वारसा लाभलेले आहे. स्थानिक उमेदवार म्हणून मूल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर या तालुक्यांतील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, आणि हजारो समर्थक त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.
शिक्षण क्षेत्रातही मारकवार यांची विशेष पकड असून ग्रामीण भागातील जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास आहे. जनतेनेच त्यांना उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे ॲड. रितेश मारकवार यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.