नांदेड प्रतिनिधी: बालाजी पाटील
हदगाव तालुक्यातील बेलमंडळ गावात वाळू तस्करीचा प्रश्न गंभीर बनला असून, या तस्करीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास गावपातळीवर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
बेलमंडळ येथील रेती डेपोवरून चोवीस तास टिप्पर वाहतूक सुरू आहे. मद्यधुंद अवस्थेतील ड्रायव्हर वाहन चालवत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्यांवर झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यात वाळू उपसावर बंदी असली तरी हदगाव परिसरात चोरीछुपे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या तस्करीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून नैसर्गिक वाळूला प्राधान्य दिले जात असल्यामुळे तस्करांचा सुळसुळाट झाला आहे.
वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यात महसूल विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तस्करांविरोधात तातडीने कारवाई करण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तस्करीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे. अन्यथा पुढील काळात आंदोलने तीव्र करण्यात येतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.