शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झालेल्या पारायण सोहळ्याचा समारोप श्रींच्या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून करण्यात आला.
१२ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या पारायण सोहळ्यामध्ये शिर्डी व पंचक्रोशीतील सुमारे ६,५०० पारायणार्थी सहभागी झाले होते. आज (१३ ऑगस्टला) सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचनाने ग्रंथ समाप्ती झाली. यानंतर श्री साईसचरित या पवित्र ग्रंथाची पूजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी आदींसह पारायणार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारायणार्थ्यांसाठी सकाळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३.३० वाजता श्री साईसचरित पारायण समारोपाच्या मिरवणुकीत पारंपारिक संबळ वाद्यांचे १०-१२ पथके, श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, कुडाळ यांचे ३ धार्मिक देखाव्यांचे चित्ररथ व विशेष आकर्षण म्हणून रंजीनी आर्ट्स, मालाप्पुरा, केरळ यांचे पारंपारिक वाद्य व दक्षिणात्य नृत्यासह विविध सोंगे आदींचा समावेश होता. या मिरवणुकीत पारायणार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.