*सेलू:* स्थानिक नगरपंचायतच्या हद्दीत महावितरणने अनधिकृतपणे तीन अंगणवाड्यांच्या परिसरात रोहित्र उभारले आहे. यामुळे अंगणवाडीतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या दबावाखाली शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये हे रोहित्र बसवले असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविकांनी केला आहे. याठिकाणी तीन अंगणवाड्या असून, येथे जवळपास १५० विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. या धोकादायक रोहित्रामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपच्या नगरसेविका वेणूताई शंकरराव राऊत, अनिता चुडामण हांडे, मनिषा मंगेश भलावी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष चुडामण हांडे यांनी पत्रकार परिषदेत महावितरणच्या या कारवाईवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे की, त्यांनी नगरपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नाही आणि नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त रोहित्र स्थलांतरित करण्याचा ठराव झाला तरी त्यांनी कार्यवाही केली नाही.
अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे स्थानिक नगरपंचायतीने पत्रव्यवहार करून जिल्हाधिकारी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, जिल्हा नियोजन समितीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त रोहित्र उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपच्या नगरसेविकांनी कडक प्रतिकार केला.
भाजपच्या नगरसेविकांनी यानंतर तीव्र आंदोलनाची धमकी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक जागेवर महावितरणने अनधिकृतपणे रोहित्र उभारून अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त रोहित्राचे स्थलांतर तत्काळ करावे, अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे भाजपच्या नगरसेविकांनी महावितरणच्या अनधिकृत रोहित्राच्या विरोधात उचललेले हे कडक पाऊल शहरातील राजकारणात मोठी गडबड निर्माण करण्याची शक्यता आहे.
भाजप विरुद्ध भाजप सामनायाप्रसंगी सेलूच्या राजकारणात भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचे दिसून येते. यात वादग्रस्त रोहित्र भाजपच्या एका नगरसेवकाच्या प्रभागातून दुसऱ्या नगरसेवकाच्या प्रभागात स्थलांतरित करण्यासाठी महावितरणचा मात्र पार गोंधळ उडाला आहे. नियम धाब्यावर बसवून रोहित्र स्थलांतरित करण्याचा घाट घातला गेला. परंतु भाजपच्याच नगरसेवकांनी तो हाणून पाडण्यासाठी कंबर कसल्याने शहरातील नागरिकांना भाजप विरुद्ध भाजप असा रंगतदार सामन्याची मेजवानी येत्या काळात मिळणार, यात शंका नाही