गावकऱ्यांनी केले मान्यवरांचे ढोल-ताश्यांच्या गजरात स्वागत
अहेरी(गडचिरोली):- ग्रामीण भागातील युवा वर्गामध्ये विविध क्रीडा कौशल्य आहेत. गाव पातळीवरून शहरापर्यंतच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची क्षमता आहे. मात्र,व्यसनाधीनतेमुळे ग्रामीण भागातील असंख्य खेळाडू पाहिजे त्या स्तरावर पोहचू शकले नाही.त्यामुळे खेळात रुची असणाऱ्यांनी व्यसनाकडे न वळता विविध खेळात सातत्य राखावे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
अहेरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मुडेवाही-रेगुलवाही ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रेगुलवाही येथे सुरू असलेल्या भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामान्यांच्या बक्षीस वितरण समारोपात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर रेगुलवाहीचे सरपंच कु ममिता नैताम,उमानूर चे सरपंच श्रीनिवास गावडे,रेगुलवाही चे उपसरपंच कृष्णा गावडे,मरपल्ली चे सरपंच अरुण वेलादी,उप सरपंच यशवंत डोंगरे,पेरमा किष्टा वेलादी,प्रकाश सिडाम,आनंदराव तलांडे,कोतवाल मधुकर कुळसंगे, येर्रावार,ग्रा प सदस्य सालय्या कंबालवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना,नियमित सराव करून विविध खेळांत सहभाग घेतल्यास राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारण्याची क्षमता ग्रामीण भागातील खेळाडू मध्ये आहे.मात्र, युवा पिढी व्यसनेकडे वळत असल्याने त्यांना मोठी मजल मारणे शक्य होत नाहीय.गावपातळीवर उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतात. त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.एवढेच नव्हेतर,विविध आधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्यास नियमित सराव करणे शक्य होईल.ग्रामीण भागातील खेळाडूंना भविष्यात ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता आहे.त्या-त्या गोष्टी उपलब्ध करण्यासाठी आपण तत्पर आहो.मात्र,आपल्या मध्ये असलेल्या क्रीडा कौशल्यना व्यसनात वाया घालउ नका असेही त्यांनी आवाहन केले.
दि.11 फेब्रुवारी पासून रेगुलवाही येथील महालक्ष्मी भव्य पटांगणावर व्हॉलीबॉल सामने सुरू होते. या व्हॉलीबॉल स्पर्धेत जवळपास 22 संघांनी सहभाग नोंदवला होता.16 फेब्रुवारी रोजी गोल्लागुडम आणि रेगुलवाही या दोन संघात अंतिम सामना खेळला गेला. सामन्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.यात गोल्लागुडम संघाने प्रथम तर रेगुलवाही संघाने द्वितीय आणि वेंकटापुर संघाने तृतीय पारितोषिक पटकाविले.
या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भाग्यश्री आत्राम यांचेकडून 21 हजार प्रथम पारितोषिक, उमानूर चे सरपंच श्रीनिवास गावडे यांचेकडून 15 हजार तर रेगुलवाही चे सरपंच ममिता नैताम यांचेकडून 10 हजार रुपयांचे रोख रक्कम देण्यात आले.अंतिम सामन्यानंतर भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.