वरोरा: तहसील प्रशासनाने वरोर्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई केली असून, तीन ट्रॅक्टरसह एकूण 3 ब्रास रेती जप्त केली आहे. ही कारवाई 3 डिसेंबर रोजी पहाटे करण्यात आली.
मौजा सूर्ला येथील नदी घाटावरून एक ब्रास रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त.मौजा खांबडा येथे अवैधरित्या रेती वाहतूक करणारा दुसरा ट्रॅक्टर जप्त.मौजा सुसा येथे एक ब्रास रेतीसह आणखी एक ट्रॅक्टर जप्त.तिन्ही ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि रेतीचा मुद्देमाल तहसील कार्यालय, वरोर्यात जमा करण्यात आला आहे.
सदर कारवाई तहसीलदार वरोर्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत मंडळ अधिकारी अजय निखाडे (शेगाव बु.), तलाठी अमोल घाटे (चीनोरा), आणि शिपाई सचिन शेळकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या कारवाईमुळे प्रशासनाने अवैध खनिज वाहतुकीविरोधात उचललेले पाऊल जनतेमध्ये कौतुकास्पद ठरत आहे. पुढील तपास सुरू असून या मोहिमेमुळे अवैध वाहतुकीवर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.
दलाल सक्रिय:
वरोरा शहरालगतच्या मार्डा, करंजी, तुळाना या घाटांवर मध्यरात्री मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी काही दलाल सक्रिय असून, ते तहसील कार्यालयात वावरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. अधिकारी मोहिमेवर निघाल्याची कुणकुण लागताच तस्करांना माहिती देणे, तसेच कारवाईच्या ठिकाणी जाऊन तस्करांना वाचवण्यासाठी सेटलमेंट करण्याचे काम ही दलाल मंडळी करत असल्याची चर्चा आहे.या परिस्थितीत प्रशासनाने दलालांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महसूल वसुलीचा यशस्वी टप्पा:
1 ऑगस्ट 2024 पासून आजपर्यंत तहसील प्रशासनाने अवैध उत्खनन व वाहतूक करताना एकूण 50 वाहने जप्त केली असून, शासन खजिन्यात रु. 63,73,400/- इतका महसूल जमा करण्यात आला आहे.
.