अहिल्यानगर : संगमनेर येथे आज स्नेह संवाद मेळाव्यात तालुक्यातील जन समुदायासोबत मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते तथा तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती. ती आज या स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर झाली.
एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी तालुक्यातील जनतेने कायम साथ दिली आहे. आपले राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे ते कोणीही हलवू शकत नाही. काहीही झाले तरी जनता आपल्याच सोबत आहे याची खात्री आहे. मागील 40 वर्षात आपण संगमनेर तालुक्याची ओळख बदलली आहे. सतत दंगली होणारा तालुका आपण सुसंस्कृत व संयमी बनवला. सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकास कामे केली. यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केला नाही. मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी धर्म, जाती, भेद निर्माण करत जनतेच्या मनात विष पेरले. आता मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे.
आपणही तीर्थरूप स्व. भाऊसाहेब थोरात यांचे वारसदार असून लढणे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या उभारीने जनतेत जाणार आहे. तालुक्यातील जनतेवर कार्यकर्त्यांवर व सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण कधीही सहन करणार नाही. यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही. पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद व मनभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे. आपण तयार केलेला सुसंस्कृत तालुका व त्याचा विकास ही प्रत्येकाचीच आता जबाबदारी असल्याचे ते बोलले.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.