अहमदनगर (जिल्हा प्रतिनिधी) सुरक्षेला प्राधान्य देत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शिर्डी विमानतळ परिसरालगतच्या रस्त्यांच्या विकासासाठी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्या वतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पार पडली. जिल्हाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला शिर्डी विमानतळ संचालक सुशिल कुमार श्रीवास्तव, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट दिनेश दहीवाडकर, विमानतळ परिचालन व सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, शिर्डी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे उपस्थित होते.
विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी विमानतळ प्रशासन, नगर पंचायत, जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने ताळमेळ ठेवून विविध कामे पार पाडावी. परिसरातील बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी नोडल अधिकार्याची नियुक्ती करणे, भटकी कुत्री आणि पक्षांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केल्या. धावपट्टीत वाढ करणे तसेच विमानांसाठी नाईट लँडींग सुविधा कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी मागील बैठकीतील ठराव व विमानतळ प्रशासनाने केलेल्या कामांचे सादरीकरण केले.