चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीटंचाईसाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
गावा-गावात जाऊन पाहणी करण्याच्या भाजपा कार्यकर्त्यांना सूचना
चंद्रपूर: प्रचंड चटके लावणाऱ्या उन्हाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या घशाला कोरड पडू नये, यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. ना. मुनगंटीवार यांनी यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना गावागावात जात पाणीटंचाईचा आढावा घेण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी चंद्रपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांना सूचना केली आहे.
लोकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जल जीवन मिशनच्या माध्यमातून, ‘हर घर कनेक्शन’चे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. या योजनेतून प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत असली, तरी अशा योजना सुरू झाल्या की नाही, याची माहिती घेण्याची सूचना ना. मुनगंटीवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली आहे.
जिल्ह्यातील बोअरवेल, विहिरी, हॅण्डपंप, वॉटर एटीएम, घरांमधील नळ कनेक्शन याबाबत सविस्तर माहिती घेण्यासोबतच ज्या भागात पाणीटंचाई आहेत, त्याची कारणे शोधण्यासही त्यांनी सांगितले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी 845 स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. यापैकी ज्या योजनांचे वीजबिल थकीत असेल ते तातडीने भरण्याच्या सूचना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला यापूर्वीच दिल्या आहेत. संपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी विशेष व्हॉट्सॲप क्रमांक (9552799608) सुरू करण्यात आला असून संबंधित माहिती त्यावर पत्र स्वरूपात पाठविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.