मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अबू आझमी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेतदेखील याचे पडसाद उमटले आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे. अबू आझमी यांचे निलंबन झाले पाहिजे.अ
शा घोषणाबाजी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अबू आझमी देशद्रोही, त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे’. अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आझमींवर निशाणा साधला आहे.
तसंच, अबू आझमी यांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून निलंबनाची कारवाई केली पाहिजे.
अशी मागणीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘छावा सिनेमा पाहा छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अबू आझमी यांच्याविरोधात दोन्ही सभागृहात सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली.
अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. अनेक ठिकाणी अबू आझमी यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. खासदार नरेश मस्के यांनी देखील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करत गुन्हा नोंदवून घेण्याची मागणी केली आहे.












