(कार्यालयीन प्रतिनिधि) – जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या विकासासाठी क्रीडा विभागामार्फत १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याद्वारे व्यायाम व क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यात येईल,असे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुल येथील बहुउद्देशिय इमारतीचा लोकार्पण पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार हरीष पिंपळे, नगराध्यक्ष मेहफुज खान, पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसिलदार जी.के. हामंद, दगडपारवा सरपंच इंदूबाई महल्ले, धाळू गुरुजी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री कडू म्हणाले की, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना सलग तीन वर्ष तीन हजार रूपये शिष्यवृत्ती जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून उपलब्ध करुन देवू.जिल्ह्यातील क्रीडा सुविधा विकासांसाठी १००कोटींचा प्रस्ताव क्रीडा विभागांमार्फत तयार करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद अंतर्गत ५२ गावे व्यायाम साहित्य व क्रीडा विषयक बाबी देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रथमच राज्यात राबविण्यात येणार आहे. खेळाडूंना नोकरी व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचाराधीन असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुल येथील जागेवर बि.ओ.टी. प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव करुन त्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व तालुका क्रीडा संकुल व अकोला जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत प्रत्येक तालुक्यात किमान ४०० बांबू वृक्ष लागवड करुन संबंधीत यंत्रणेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल. तालुका क्रीडा संकुलात जागा उपलब्धतेनुसार क्रीडा विषयक बाबीच्या सोई सुविधांची निर्मिती करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.
तत्पुर्वी पालकमंत्री बच्चु कडू यांनी बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुल येथील बहुउद्देशिय इमारतीचे रिबीन कापून व कोनशिला अनावरणाद्वारे लोकार्पण केले. तसेच अकोला जिल्ह्याचा १०० कोटी रुपयांचा क्रीडा विकास आराखडा पुस्तिकेचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले. यावेळी आमदार हरीष पिंपळे व माजी आमदार तुकाराम बिडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये दगडपारवा येथील प्रभुसिंग नाईक शाळेचे विद्यार्थी तसेच दगडपारवा येथील खेळाडू व बार्शिटाकळी येथील नागरीक खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. खुशबू चोपडे व त्यांचे बँड पथकाने ढोल ताशा वाजून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमांतर्गत सेवानिवृत्त दिनकर उजळे व प्रशिक्षक खुशबू चोपडे यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्र. तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी तर आभार प्रदर्शन दिनकर उजळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, मनीषा ठाकरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट, विजय खोकले, प्रशांत खापरकर, महेश पवार, दीपक व्यवहारे, निशांत वानखडे, विक्रम काळे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे, राजू उगवेकर यांनी परिश्रम घेतले