(कार्यालयीन प्रतिनिधि)-अकोला शहराच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून आपण नेहमीच सहकार्य करू, शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी, प्रस्तावित कामांची मंजुरी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.
अकोला महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेअंतर्गत शिलोडा येथील ३० एम.एल.डी. आणि उमरी येथील त ७ एम.एल.डी. मलजल शुद्धीकरण केंद्राचे (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प)लोकार्पण आज पालकमंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास महापौर सौ.अर्चनाताई मसने,पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले, विधानसभा सदस्य आ.रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोनिका राऊत, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती संजय बडोणे, मनपा उपायुक्त डॉ.पंकज जावळे, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की,अकोला महानगरपालिकेने अमृत योजने अंतर्गत शुद्ध होणारे सांडपाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील ६०० एकर जमीनीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे.
प्रास्ताविकातून नगरसेवक विजय अग्रवाल यांनी योजनेची माहिती दिली. यावेळी महापौर अर्चनाताई मसने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अभियंता अजय मालोकार यांनी केले. या कार्यक्रमात मनपा पदाधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.