शिर्डी :सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास पाथरे गावाजवळ खाजगी आराम बस आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात एक जण मयत झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथून सुरतच्या दिशेने जाणारी खाजगी बस एम पी 45 झेड ई 4499 पाथरे येथील साई भक्त निवास समोर आली. तेव्हा विरुद्ध बाजूने समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडकली. विरुद्ध बाजूने हा ट्रॅक्टर येत असल्याने बस चालकाला अंदाज आला नाही. या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. बसचा कंडक्टर तसेच ट्रॅक्टर सोबत असणारे दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
अपघाताची माहिती समजल्यावर वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. पाथरे परिसरातील तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्व जखमींना पिंपरवाडी तोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेतून कोपरगावच्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
तेथे एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही मृत व्यक्ती ट्रॅक्टरसोबत होती. बसचा कंडक्टर आणि ट्रॅक्टरवर असलेल्या आणखी एका व्यक्तीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा ट्रॅक्टर ऊस तोडणी कामावरील असल्याची चर्चा आहे. मात्र हा ट्रॅक्टर नवीन असून पासिंग झाला नसल्याचे सांगण्यात आले.
विरुद्ध दिशेने हा ट्रॅक्टर पाथरे गावाच्या दिशेने जात होता. ट्रॅक्टरसोबत जोडलेल्या ट्रॉलीत ऊस भरलेला होता. ट्रॅक्टर सोबत असलेला मृत आणि जखमी व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील पाचोरा परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांची कोणतीही ओळख पटवता आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.