अहेरी : अहेरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते १७ जुलै रोजी अहेरी पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाले. जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ९ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
यापूर्वी गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांच्याकडे होता.निलेश ठाकरे हे यापूर्वी देसाईगंज पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. अहेरी येथे रुजू झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
अहेरी तालुक्यात ३९ ग्रामपंचायती असून हा जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या तालुक्यांपैकी एक आहे. तेलंगाणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत असलेल्या या तालुक्यात अनेक गावे दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विकासकामांचे नियोजन आणि ग्रामपंचायतींशी समन्वय राखण्याची महत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी निलेश ठाकरे यांच्यावर असणार आहे.
विशेष म्हणजे, अहेरी हा गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणारा तालुका आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राखत विकासकामांना गती देणे, तसेच दुर्गम भागापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.













