अमरावती प्रतिनिधी :
समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ वर्षीय चिमुकलीचाही समावेश असल्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक १०५ जवळील टोलनाका परिसरात घडली. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेली वॅगनआर कार भरधाव वेगात जात असताना समोरील ट्रकला मागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात आरती जीवने (४०), भास्कर जीवने (५७), महादेव जीवने (४२), लता जीवने (४३) आणि त्रिशा जीवने (१२) (सर्व रा. डी.एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
समृद्धी महामार्गामुळे राज्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ झाला असला, तरी अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालनेमुळे या महामार्गावर सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. या ताज्या दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.













