गडचिरोली: जिल्ह्यात माओवाद्यांविरोधातील निर्णायक लढ्यात सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी गुप्तपणे उभारलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि जमिनीत पुरून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील शस्त्रनिर्मितीचे साहित्य गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत उध्वस्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ जून रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. विशेष अभियान पथक (सी-६०), प्राणहिता युनिट, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दुर्गम जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली.
२७ जून रोजी बालबेडा जंगलात कसून तपासणीदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेले माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. यात सुमारे ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० बारा बोअर पाईप, २० रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य आढळून आले.
बीडीडीएसच्या जवानांनी परिसर सुरक्षित केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांच्या मते, हे साहित्य भविष्यात सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी तसेच विविध नक्षल कारवायांसाठी वापरले जाणार होते.
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांविरोधातील सातत्यपूर्ण कारवायांमुळे त्यांची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात खिळखिळी झाली असून, शस्त्रसाठे आणि लॉजिस्टिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षा दलांकडून आक्रमक मोहीम सुरूच आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी सहभागी जवानांचे विशेष कौतुक केले.













