ब्रह्मपुरी : सुहास हजारे :- ब्रह्मपुरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा अथवा जिल्हा निर्मिती होईपर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व जिल्हास्तरीय उप-कार्यालये तातडीने मंजूर करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची त्यांच्या ब्रह्मपुरी येथील निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेत चालू पावसाळी अधिवेशनात महसूल विभागाच्या चर्चेदरम्यान हा विषय प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. ब्रह्मपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न केले जातील तसेच जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संघर्ष समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचा वाढता भौगोलिक विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रशासकीय सुलभतेसाठी जिल्ह्याचे विभाजन करणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ब्रह्मपुरी येथे उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी महत्त्वाच्या सुविधा आधीच उपलब्ध असल्याने स्वतंत्र जिल्हा निर्माण होईपर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच एमआयडीसी कार्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
समितीने आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे शासनाला जाब विचारण्याचीही विनंती केली. ब्रह्मपुरी जिल्हा प्रस्तावाची सद्यस्थिती, चिमूर जिल्हा निर्मितीला असलेला विरोध तसेच मेंडकी, मुडझा, तळोधी (बा.) आणि नवरगाव या मोठ्या गावांना तालुक्याचा दर्जा देण्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावर आमदार वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीच्या हक्काचा आवाज विधिमंडळात ठामपणे मांडण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत प्रा. देविदास जगनाडे व विनोद झोडगे यांनी प्रमुख भूमिका बजावली.
शिष्टमंडळात संघर्ष समितीचे प्रमुख निमंत्रक विनोद झोडगे पाटील, प्राचार्य सुयोग बाळबुधे, नगरसेवक अविनाश राऊत, हरिचंद्र चोले, प्रा. देविदास जगनाडे, नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष नितीन उराडे, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, पुष्पांकर बांगरे, हितेंद्र राऊत, खेमराज तिडके, डॉ. बाळकृष्ण शेळके, दिलीप जुमडे, रक्षित रामटेके, आकाश खांडेकर, प्रशांत घुटके, भगवान कन्नाके, लीलाधर झलके, घनश्याम कावळे, प्रभाकर नाकतोडे, एम. गाजी पटेल, इंजि. राहुल मैद, अमोल मोटघरे, गणेश बगमारे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि परिसरातील सुमारे ५० ते ६० जागृत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू भागवत यांनी केले.













