देवळी , प्रतिनिधी : देवळी विधानसभा मतदारसंघातील देवळी व पुलगाव या महत्त्वाच्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजेश बकाने यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. शहरांतील प्रलंबित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासह नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
देवळी विधानसभा क्षेत्रातील देवळी व पुलगाव या दोन्ही नगरपरिषद क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असून वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता विविध मूलभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमधील रस्ते, नाली बांधकाम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, उद्याने, सार्वजनिक सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, शहर सुशोभीकरण तसेच इतर नागरी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे आमदार बकाने यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले.
यावेळी त्यांनी देवळी व पुलगाव नगरपरिषदांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच दोन्ही शहरांच्या भविष्यातील विकास आराखड्याला गती देण्यासाठी नगरविकास विभागाकडून आवश्यक प्रशासकीय मान्यता व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बकाने यांनी मांडलेल्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आमदार राजेश बकाने म्हणाले की, देवळी आणि पुलगाव ही दोन्ही शहरे मतदारसंघाच्या विकासाची प्रमुख केंद्रे असून नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. शहरांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास अनेक प्रलंबित कामांना गती मिळेल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक समस्या मार्गी लागतील.
या भेटीमुळे देवळी व पुलगाव शहरांच्या विकासकामांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.













