ब्रह्मपुरी : सुहास हजारे
ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत एका आंतरराज्यीय टोळीतील सराईत गुन्हेगारांना अवघ्या 24 तासांत जेरबंद करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.दिनांक 22 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास फिर्यादी रामचंद्र सखाराम मोहुर्ले (रा. अड्याळ जानी, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) यांनी सीडीसीसी बँक, ब्रह्मपुरी येथून 30 हजार रुपये काढले होते. त्यांनी ही रक्कम एका कापडी पिशवीत ठेवून तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात मुलीच्या जात प्रमाणपत्राच्या कामासाठी गेले होते.यावेळी त्यांच्या हातातील पैशांची पिशवी बाजूला ठेवलेली असताना कोणीतरी मागून आवाज दिल्याने ते मागे वळून पाहू लागले. मात्र मागे कोणीही नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पैशांची पिशवी पाहिली असता ती जागेवर नव्हती. त्यांनी तत्काळ शोध घेतला, मात्र पिशवी मिळून आली नाही. याबाबत त्यांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 540/2026 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन त्यांना अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले. आरोपींची झडती घेतली असता चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम, फिर्यादीचे बँक पासबुक तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यामुळे हा गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकेश गजबे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्निल पळसपगार आणि वरिष्ठ रंगारी यांनी सहभाग घेतला.
https://www.facebook.com/share/v/18uPtU9hPq/













