भामरागड :- आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांच्या पदोन्नतीनंतर वेतननिश्चिती करतांना गंभीर विसंगती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यासाठी शिक्षक संघटनांनी आरोपही केला आहे.पदोन्नती मिळाल्यानंतर पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी पगार मिळत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.ही पदोन्नती आहे की आर्थिक नुकसान? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या १८ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानूसार गट-अ ते गट- ड मधील सर्व पदधारकांना सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आल्यानंतर आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभांबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या.त्यानुसार अनेक शिक्षकांना पदोन्नतीनंतर नविन पदावरील वेतननिश्चिती करतांना त्यांच्या पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी वेतन मंजूर करण्यात आले आहे.परिणामी कनिष्ठ शिक्षकांच्या तुलनेत पदोन्नती झालेल्या वरिष्ठ शिक्षकांचे वेतन कमी झाल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेतन विसंगतीमुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले असून पदोन्नती घेऊन नेमका काय फायदा? असा प्रश्न शिक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे.पदोन्नती ही प्रगतीचे प्रतिक असतांना त्यातून आर्थिक नुकसान होत असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक संघटनांनी शासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून पूर्वीच्या एकस्तरांवर एक वेतनवाढ वाढवून वेतननिश्चिती करण्यात यावी. या तत्त्वानूसार वेतननिश्चिती करुन कोणत्याही शिक्षकांचे वेतन कमी होणार नाही याची हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात संबंधित विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.पदोन्नतीनंतर वेतन कमी होणे ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे. शासनाने तातडीने या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेऊन पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.













