अहेरी: महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा आलापल्ली–सिरोंचा (राष्ट्रीय महामार्ग 353-सी) पहिल्याच दमदार पावसात ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मोसम गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी वळण रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली. परिणामी अनेक प्रवाशांना तब्बल सहा तास रस्त्यावरच थांबावे लागले.
गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावताच महामार्गावरील अपुऱ्या आणि निकृष्ट पर्यायी व्यवस्थेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असले तरी अद्यापही ते पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिक, रुग्ण, गरोदर माता आणि वाहनधारकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. अनेक वेळा आंदोलने, उपोषणे आणि निवेदने देऊनही या महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. परिणामी नागरिकांच्या समस्यांमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे.
मोसम गावात सहा तास वाहतूक ठप्प
मोसम गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असून पावसाळ्याच्या तोंडावरच काम हाती घेण्यात आले. मात्र पर्यायी वळण रस्ता मजबूत न बांधल्याने तो पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे पहाटेपासून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर सुमारे सहा तासांनंतर तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून वाहतूक सुरू करण्यात आली.
पुसूकपल्ली फाट्यावरही तीच स्थिती
मोसम गावाप्रमाणेच पुसूकपल्ली फाट्याजवळही रहदारी ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांचा वेळ वाया गेला तर अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय झाली.
आता तरी दखल घेणार का?
तीन राज्यांसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था वर्षानुवर्षे बदलत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होताच उघड झालेल्या या समस्येची शासन आणि प्रशासन आता तरी गंभीर दखल घेणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.













