वरोरा, प्रतिनिधी : खरीप हंगामाच्या तोंडावर डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) व युरिया खताचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंत मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वरोरा तालुका सेवा सहकारी संस्था संघटनेच्या वतीने तहसीलदार , यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांना तातडीने खत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यात सध्या डीएपी व युरिया खताचा पुरवठा अत्यंत अपुरा आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले खत उपलब्ध नसल्याने हजारो शेतकरी चिंतेत असून कृषी केंद्रांच्या फेऱ्या मारत आहेत. अनेक कृषी केंद्रांनी आगाऊ रक्कम भरलेली असतानाही खताचा पुरवठा होत नसल्याची बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जयंत टेमुर्डे यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधताना सांगितले की, पावसाळ्याची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व सर्व तयारी पूर्ण केली आहे. अशा वेळी खतांचा तुटवडा निर्माण होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. वेळेत खत उपलब्ध न झाल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.
निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन कृषी केंद्रांमार्फत डीएपी व युरिया खताचा पुरेसा व नियमित पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही नमूद करण्यात आले.
या निवेदनावेळी वरोरा तालुका सेवा सहकारी संस्था संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जयंत टेमुर्डे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात असून प्रशासनानेही या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













