चंद्रपूर प्रतिनिधी :
चंद्रपूर-यवतमाळ-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांना गती देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर येथे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी विविध रेल्वे प्रकल्प, प्रवासी सुविधा आणि पायाभूत कामांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
बैठकीत चिरादेवी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानक परिसरात तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला गती देण्याची आवश्यकता खासदारांनी अधोरेखित केली.
वरोरा शहरातील आनंदवन चौक आणि बोर्डा अंडरपास येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आधुनिक ड्रेनेज व्यवस्था उभारणे तसेच पुरेशा प्रकाशयोजनेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय वणी आणि चिखलगाव येथे सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांच्या कामाचा वेग वाढवून ती लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. रखडलेल्या कामांमुळे नागरिक आणि प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयींकडेही रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
माजरी-भद्रावती मार्गावरील रेल्वे फाटक दीर्घकाळ बंद राहत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असल्याची बाब उपस्थित करण्यात आली. रेल्वे वाहतुकीच्या प्रत्यक्ष वेळेतच फाटक बंद ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच भविष्यात येथे उड्डाणपूल किंवा अंडरब्रिज उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी खासदारांनी केली. चिरादेवी-ढोरवासा अंडरपासमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने त्यासाठीही तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात माजरी रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेले महत्त्वाचे रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करण्याचाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. दक्षिण एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, अंदमान एक्सप्रेस, बंगलोर एक्सप्रेस, जी.टी. एक्सप्रेस तसेच काझीपेठ-अजनी पॅसेंजर या गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू झाल्यास परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय १ जुलै २०२१ रोजी कर्तव्य बजावताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणि पाय गमावलेल्या रेल्वे कर्मचारी राजू सदाशिव संगोजीवार यांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. सध्या त्यांची नियुक्ती आमला येथे असून त्यांच्या शारीरिक परिस्थितीचा विचार करून त्यांना घुग्घुस, बल्लारशाह किंवा चंद्रपूर येथे बदली देण्यात यावी, अशी मानवतावादी मागणी खासदारांनी केली.
या सर्व मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच विविध प्रलंबित प्रस्तावांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खासदार कार्यालयाकडून देण्यात आली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.













