गोंडपिपरी ( सुरज माडूरवार)
अहेरी–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील धानापूर फाट्याजवळ मंगळवारी (दि. २ जून) सकाळी झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण समोरासमोर धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतकाचे नाव रोशन वसंत लोहट (वय ३४, रा. चारगाव, चेक ता. नागभीड) असे असून ते करंजी येथे सासुरवाडीत मुक्कामी होते. त्यांच्यासोबत मित्र चुडामणी माधव मडावी व खुशाल मडावी हे देखील करंजी येथे आले होते. मंगळवारी सकाळी रोशन लोहट हे मित्रांसह दुचाकीने करंजीहून गोंडपिंपरीकडे जात असताना धानापूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या गोंडपिपरी येथील राम विजय मराठे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की, रोशन वसंत लोहट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील चालकासह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने मदत मिळावी म्हणून गोंडपिंपरी येथून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिंपरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार देवाजी निखाडे, पोलीस कर्मचारी सचिन झाडे व प्रवीण कडुकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एमएच-३४ एसी-३३२५ असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत.













