चिमूर | प्रतिनिधी : शेषराव राऊत
चिमूर तालुक्यातील मोठेगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना सलग घडत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच काजळसर येथील शेतकरी विजय सोनवणे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यापूर्वीच एका शेतकऱ्याची गाय व बैलही वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांची चर्चा सुरू असतानाच मोठेगाव येथील गुराखी दिलीप नन्नावरे याच्यावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोठेगाव येथील गुराखी दिलीप नन्नावरे हा सकाळी सुमारे आठ वाजता आपल्या बकऱ्या चारण्यासाठी परिसरातील पहाडी व झुडपी जंगलात गेला होता. त्याचवेळी अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. हल्ल्यानंतर घाबरलेल्या बकऱ्या परत गावाकडे आल्या, मात्र दिलीप न परतल्याने ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली.
शोधादरम्यान त्याचा मृतदेह जंगल परिसरात वाघाने अर्धवट खालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती तात्काळ वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक दिलीप नन्नावरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वनविभागाने तात्काळ ५० हजार रुपयांची मदत कुटुंबाला दिली असून उर्वरित मदत नियमानुसार देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या सततच्या घटनांमुळे परिसरात वाघाची मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खरिप हंगाम सुरू असल्याने शेतकरी व गुराख्यांचा जंगलात वावर वाढला आहे. मात्र वनविभागाकडून योग्य उपाययोजना न झाल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.













