मूल : वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठ्यावरील ताण आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे चिचाळा गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावासाठी वाढीव पाणीटाकी तसेच स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गट्टूवार यांनी आमदार Sudhir Mungantiwar यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, चिचाळा गावाची लोकसंख्या सध्या पाच हजारांहून अधिक असून विद्यमान पाणीटाकी गावाच्या वाढत्या गरजांच्या तुलनेत अपुरी पडत आहे. परिणामी नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलजीवन अभियानांतर्गत नवीन वाढीव पाणीटाकी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने अधिकृत ठरावदेखील मंजूर केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, चिचाळा येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या गावात केवळ आरोग्य उपकेंद्र कार्यरत असून ते मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न आहे. चिचाळा ते मारोडा हे सुमारे दहा किलोमीटर अंतर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यातच हळदी, ताडाळा, कवडपेठ, दहेगाव, भेजगाव, मानकापूर, भंजाळी आणि सिंतळा या गावांतील नागरिकांचाही भार याच उपकेंद्रावर असल्यामुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चिचाळा येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार व तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळून रुग्णांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गावाच्या मूलभूत गरजांशी निगडित असलेल्या या दोन्ही मागण्यांना शासनाने प्राधान्य द्यावे व आवश्यक निधी उपलब्ध करून विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गट्टूवार तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.













