सिंदेवाही : प्रतिनिधी
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात घडलेल्या अत्यंत भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघाने अचानक हल्ला करून त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीती, संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही-पवनपार जंगल परिसरालगत आज सकाळच्या सुमारास काही महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. जंगलातील दाट परिसर आणि वाघाच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांना बचावाची कोणतीही संधी मिळू शकली नाही.
घटनेची माहिती गावात पोहोचताच परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील वर्षीदेखील सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावजंगल परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी एका वाघिणीने सलग तीन महिलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. वर्षभरानंतर पुन्हा त्याच परिसरात चार महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून जंगल परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी या भागात तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासातील तसेच महाराष्ट्रातील मानव-वन्यजीव संघर्षातील ही अत्यंत गंभीर आणि मोठी घटना मानली जात असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.













