उमाकांत अहिरराव | धुळे
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा–शिंदखेडा मार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात मालवाहतूक ट्रकने दुचाकी आणि टाटा मॅजिक वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. घटनेनंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोंडाईचा येथून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या अज्ञात मालवाहतूक ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला तसेच टाटा मॅजिक वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये धमाणे येथील रजेसिंग दगासिंग गिरासे आणि रोहित निंबा गिरासे यांचा समावेश आहे. दोघेही दुचाकीवरून धमाणे येथून दोंडाईचाकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले; मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या अपघातात टाटा मॅजिक वाहनाच्या चालकास किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी चालकावर प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून प्रत्यक्षदर्शींची माहितीही संकलित करण्यात येत आहे. फरार ट्रक आणि चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण आणि फरार चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे धमाणे व दोंडाईचा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.













