वरोरा : समाजातील जुन्या रूढी-परंपरांना छेद देत आणि लग्नातील अवाजवी खर्चाला आळा घालत पेवरा येथील एका नवदांपत्याने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. सतीश पंढरी जीवतोडे आणि ममता मनोहर मानकर यांचा शुभविवाह २ मे रोजी साधेपणाने पार पडला; मात्र या विवाहातून उभा राहिलेला सामाजिक संदेश सर्वदूर चर्चेचा विषय ठरत आहे.
या विवाहाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णतः हुंडामुक्त पद्धतीने पार पडला. आजही अनेक ठिकाणी हुंडा प्रथेचे सावट कायम असताना, या दांपत्याने घेतलेला ठाम निर्णय सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. त्यांच्या या कृतीमुळे तरुण पिढीला नव्या विचारांची प्रेरणा मिळणार आहे.
विवाहावेळी मिळालेली ओवाळणीतील रक्कम स्वतःसाठी न वापरता त्यांनी ‘मॅजिक’ या समाजोपयोगी उपक्रमाला देणगी म्हणून दिली. विशेष म्हणजे, नवरदेव सतीश जीवतोडे हा या उपक्रमाचा माजी विद्यार्थी असून नुकताच तो पोलीस खात्यात रुजू झाला आहे. आपल्या यशामागील या उपक्रमाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून त्याने २० हजार रुपयांची मदत देत सामाजिक बांधिलकी जपली.
याशिवाय, पारंपरिक रिसेप्शन, फटाक्यांची आतषबाजी आणि डीजे यांसारख्या अनावश्यक खर्चांना फाटा देत त्या निधीतून गावात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय’ उभारण्यात आले. या वाचनालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, नवोदय प्रवेश परीक्षा तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्गही येथे सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्याचीही योजना आहे.
या उपक्रमात सतीशचा मोठा भाऊ विशाल पंढरी जीवतोडे व वहिनी पूजा यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. वाचनालयाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळमेघे आणि सतीशचे वडील पंढरी जीवतोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “तरुण पिढीने समाजासाठी योगदान देण्याची भूमिका घेतल्यास देशाच्या प्रगतीला नवे बळ मिळेल,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला सतीशचे आई-वडील मालाताई व पंढरी जीवतोडे, ममताची आई आशाबाई मानकर, काका रवींद्र जीवतोडे, ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे, नेचर फाउंडेशनचे संचालक निलेश नन्नावरे, प्रदीप घरत यांसह नातेवाईक, मित्रमंडळी, गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतीश आणि ममता यांच्या या उपक्रमामुळे विवाह सोहळ्यांचा खर्च कमी करून तो समाजहितासाठी कसा उपयोगात आणता येतो, याचे प्रभावी उदाहरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक बदलाची नवी दिशा मिळेल, यात शंका नाही.













