गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
वढोली येथील सरस्वती माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या उच्च माध्यमिक (HSC) परीक्षेच्या निकालात दैदिप्यमान यश संपादन करत गोंडपिपरी तालुक्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास पद्धती आणि शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन यामुळे विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम राखली.
विद्यालयातील कु. समीक्षा एकनाथ भोयर हिने उत्कृष्ट गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. तिच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कु. नंदिनी कुळमेथे हिने कला शाखेत द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आर. एन. त्रिंनगरीवार यांनी विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या चिकाटी, जिद्द आणि शिस्तबद्ध अभ्यासाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे मार्गदर्शनपर विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच या यशामागे शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करत प्रा. शेडमाके, प्रा. रामटेके आणि प्रा. चौधरी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष सत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पालक-शिक्षक समन्वय आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण यांचाही या यशात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालय परिवार, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यालयाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.













