वरोरा : चंद्रपूर–नागपूर महामार्गावर नंदोरी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून मालवाहतूक वाहनातील दोघे जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 34 बीजी 0156 क्रमांकाचे मालवाहतूक वाहन वरोरा येथून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, एमएच 32 बीए 7386 क्रमांकाची दुचाकी भद्रावती येथील लग्न समारंभ आटोपून खानगाव (मोझरी) ता. हिंगणघाटकडे जात असताना नंदोरी गावाजवळ दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीवरील चंद्रशेखर वालदे (वय 29, रा. खानगाव मोझरी, ता. हिंगणघाट) व मयूर हाडके (वय 33, रा. खानगाव मोझरी, ता. हिंगणघाट) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मालवाहतूक वाहनातील अक्षय थेरे (वय 30) व रघुनाथ डाखोरे (रा. अंभोरा, चंद्रपूर) हे जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.













