भामरागड : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला अखेर पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक लाभणार आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांनी डॉ. विजय सोळंके यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
भामरागड तालुक्यात सध्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 20 उपकेंद्रे आणि 2 आरोग्य पथके कार्यरत आहेत. तालुका मुख्यालयात 30 खाटांची सुविधा असलेले ग्रामीण रुग्णालय असूनही पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे येथील प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळे रुग्णसेवा व व्यवस्थापन दोन्ही बाबींमध्ये अडचणी निर्माण होत होत्या.
दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी भामरागडचा दौरा करून येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यावेळी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षकाची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 28 एप्रिल 2026 रोजी उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांनी आदेश काढून डॉ. विजय सोळंके (वैद्यकीय अधिकारी, वर्ग-1) यांना ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे वैद्यकीय अधीक्षक पदावर पदस्थापना दिली आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या संदर्भातील विभागीय चौकशी व निलंबन आदेश रद्द करून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत स्थानिक स्तरावर चर्चांना उधाण आले असून, अशा प्रकारचे अधिकारीच भामरागडसारख्या दुर्गम भागात का पाठविले जातात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तथापि, या नियुक्तीमुळे ग्रामीण रुग्णालयातील प्रशासकीय कारभाराला गती मिळून आरोग्य सेवा सुधारेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.













