मूल (रोहित कामडे ) : समाजातील रूढी, परंपरा आणि टीकेच्या वादळाला न जुमानता मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील २९ वर्षीय पदवीधर युवक अजय रुपदेव मोहुर्ले यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. विधवा महिलेशी विवाह करून तिच्या लहान मुलीसह तिला स्वीकारत त्यांनी माणुसकीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
आजच्या काळात विवाहाचे गणित अनेकदा स्वार्थ, पैसा आणि प्रतिष्ठेभोवती फिरताना दिसते. अशा परिस्थितीत अजय मोहुर्ले यांनी मानवी मूल्यांना प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय विशेष ठरतो. त्यांच्या या कृतीमुळे एका महिलेच्या आयुष्यात नव्या आशा निर्माण झाल्या, तर एका निरागस मुलीला वडिलांचे छत्र लाभले. मात्र, या घटनेत एक वेदनादायी बाबही समोर आली असून, सासरकडील मंडळी मुलीला सोबत पाठवण्यास तयार नसल्याची माहिती आहे.
या सकारात्मक निर्णयालाही समाजातील काही घटकांकडून विरोध व टीकेचा सामना करावा लागत आहे. विधवा महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही संकुचित असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यांच्या वागणुकीवर आणि चारित्र्यावर सहज प्रश्न उपस्थित केले जातात, ही वास्तवस्थिती अजूनही कायम आहे.
अजय मोहुर्ले यांनी या संदर्भात भावना व्यक्त करताना समाजातील दुटप्पी वृत्तीवर थेट प्रश्न उपस्थित केला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण काही त्याग केला, तर त्यात चुकीचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पैसा आज आहे, उद्या नसेल; पण माणुसकी कायम टिकते. आपण दुसऱ्याला सुख देऊ शकत असू, तर ते करणं चुकीचं कसं? असेही ते ठामपणे म्हणाले.
या घटनेतून एक स्पष्ट संदेश समोर येतो विधवा महिलांना सहानुभूती नव्हे, तर समानतेची आणि सन्मानाची गरज आहे. अजय मोहुर्ले यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरू शकतो. त्यांच्या धाडसातून समाजात सकारात्मक बदलाची दिशा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













